कराची- पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकच्या मते, तो भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी सहज फोडून काढू शकतो. बुमराह अजून 'बच्चा' आहे पण, त्याचे चेंडूला सीम करण्याचे कौशल्य भन्नाट असल्याचे, रझाकचे मत आहे.
अब्दुल रझाकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की 'मी ग्लेन मॅकग्रा, वसिम अक्रम आणि शोएब अख्तर सारख्या गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे मला जर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागला असता तर ते माझ्यासाठी कठीण वाटत नाही. मी त्याची गोलंदाजी सहज फोडून काढली असती.'
या मुलाखती दरम्यान, त्याने विराटची स्तुती करताना सांगितले की, 'विराट एक यशस्वी फलंदाज आहे. तो वेगाने धावा जमवतो. पण, त्यांची सचिनशी तुलना करणे शक्य नाही. दोघांची फलंदाजी वेगळी आहे.'