कराची - पाकिस्तान संघाने श्रीलंकेविरुद्धचा कसोटी सामना २६३ धावांनी जिंकला. कराचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यासह, पाकिस्तानने दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. शिवाय पाकने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. सामनावीर आणि मालिकावीर हे दोनही पुरस्कार अबीद अलीने पटकावले.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. त्यानंतर कराची येथे दुसरा कसोटी सामना पार पडला. पाकने या सामन्यात विजय मिळवला. दरम्यान, पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावर तब्बल १३ वर्षांनंतर कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार अझहर अलीचा हा निर्णय अंगलट आला. श्रीलंकेने पाकिस्तानला १९१ धावांत गुंडाळले आणि २७१ धावा केल्या. पण, पाकिस्तानने दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. दुसऱ्या डावात शान मसूद, अबीद अली, अझहर अली आणि बाबर आझम यांनी शतकं झळकावली आणि आपला दुसरा डाव ३ बाद ५५५ धावांवर घोषित केला.
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा दुसरा डाव २१२ धावांत गडगडला. श्रीलंकेकडून ओशादा फर्नांडोने १०२ धावांची खेळी केली. मात्र, तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. पाकिस्तानच्या नसीम शाहे ३१ धावा देत ५ बळी घेतले. त्याला यासिर शाह (२), शाहीन आफ्रिदी (१), मोहम्मद अब्बास (१) आणि हॅरिस सोहेल (१) यांनी चांगली साथ दिली.