कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक आणि निवडकर्ते मिसबाह उल हक यांनी श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली. मिसबाह यांनी संभाव्य २० सदस्यीय संघात अनुभवी खेळाडूंना संधी दिलेली नाही. अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांना 'डच्चू' देण्यात आले आहे.
पाकिस्तान विरुध्द श्रीलंका संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेची सुरूवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी मिसबाह उल हक यांनी २० सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये मिसबाह यांनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर अनुभवी मलिक आणि हाफिजला वगळले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी संधी न मिळालेले, आबिद अली, अहमद शहजाद, उमर अकमल, इफ्तिखार अहमद, फहीम अशरफ, मोहम्मद रिजवान आणि उस्मान शिनकारी यांना मिसबाह यांनी संधी दिली आहे. श्रीलंका विरुध्दच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ मिसबाह यांच्या मार्गदर्शनात १८ सप्टेंबर (बुधवार) पासून सरावाला सुरूवात करणार आहे.
हेही वाचा -विश्वविक्रम! भारतासह बलाढ्य संघांना जे जमलं नाही, ते अफगाणिस्ताननं करुन दाखवलं
दरम्यान, सुरक्षेच्या कारणावरुन लंकेच्या १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानचा दौरा करण्यात नकार दिला होता. त्यामुळे हा दौरा होणार की नाही याबाबत शाशंकता होती. मात्र, श्रीलंकेने नकार दिलेल्या खेळाडूंना सोडून नविन संघाची घोषणा केली.
श्रीलंका विरोधातील मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -
सरफराज अहमद, बाबर आजम, आबिद अली, अहमद शहजाद, इफ्तिखार अहमद, इमाम वसीम, इमाम-उल-हक, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, आसिफ अली, फहीम अशरफ, फखर जमान, हैरिस सोहेल, हसन अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शादाब खान, उमर अकमल, उस्मान शिनवारी आणि वहाब रियाज.