रावलपिंडी - पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज आबिद अलीने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक झळकावलं. दरम्यान, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात शतक झळकावणारा आबिद जगातील पहिलाच फलंदाज ठरला.
रावळपिंडी स्टेडियमवर उभय संघात कसोटी सामना सुरू आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ६ बाद ३०८ धावांवर घोषित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या ३ दिवसांत केवळ ९१.५ षटकांचा खेळ झाला. चौथ्या दिवशी तर खेळ झालाच नाही. त्यामुळे पाचव्या दिवशी लंकेने डाव घोषित केला. लंकेकडून धनंजया डी सिल्वाने नाबाद १०२ धावा केल्या.
पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शान मसूद शुन्यावर बाद झाला. तेव्हा आबिद अली आणि अझर अली यांनी संघाचा डाव सावरला. अझहर ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आबिद आणि बाबर आझम यांनी नाबाद तुफानी खेळी केली. दोघांनी अनुक्रमे नाबाद १०९ आणि १०२ धावा केल्या. परिणामी, हा सामना अनिर्णीत ठरला.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आबिदने शतक ठोकले. यापूर्वी त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणात शतकी खेळी केली होती. असा पराक्रम जगातल्या कोणत्याच फलंदाजाला करता आलेला नाही. त्याने मार्च २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११२ धावा केल्या होत्या. दरम्यान, या सामन्यात आबिद अलीला पदार्पणात शतकी खेळी केल्याने सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा -प्रविण कुमारची भररस्त्यात गुंडागर्दी, व्यापाऱ्यासह ६ वर्षीय बालकाला केली मारहाण
हेही वाचा -डायपरमध्ये क्रिकेटर.. पीटरसनने विराटला विचारलं, संघात घेणार का? मिळालं 'हे' उत्तर