रावळपिंडी - पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९५ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्याच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळविले. पाकिस्तानने दिलेल्या ३७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर एडेन मार्करम याने १३ चौकार आणि ३ षटकारांसह १०८ धावांची खेळी साकारली. पण तो देखील संघाचा पराभव वाचवू शकला नाही. हसन अलीने दुसऱ्या डावात ५ विकेट घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. अलीने संपूर्ण सामन्यात १० गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी १६ विकेट घेतल्या. यात हसन अलीने १० गडी टिपले. तर सहा विकेट शाहिन शाह आफ्रिदीने घेतले. दरम्यान, पाकिस्तानने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा व्हाइटवॉश दिला आहे.