मुंबई - 18 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सौरव गांगुलीच्या युवा भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर जबरदस्त कामगिरी करत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी नोंदवली होती. 13 जुलै 2002 रोजी खेळल्या गेलेल्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला 2 गड्यांनी मात दिली होती.
भारताचे युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या सामन्याचे हिरो ठरले होते. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नासिर हुसेनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पाच गडी गमावत 325 धावा केल्या. मार्कस ट्रैस्कोथिकने 109 आणि कर्णधार हुसेनने 115 धावा केल्या.
युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गांगुली आणि वीरेंद्र सेहवागने पहिल्या गड्यासाठी 106 धावांची भागीदारी केली. परंतू, या भागीदारीनंतर भारताचे फलंदाज पटापट बाद होत गेले. 24 षटकांत 5 बाद 146 अशी भारताची अवस्था झाली होती.
मात्र, मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी 106 चेंडूंत 121 धावांची भागीदारी करुन भारताला सामन्यात परत आणले. पॉल कॉलिंगवुडने युवराजला 69 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर कैफने हरभजन सिंगबरोबर 47 धावांची भागीदारी रचली.
हरभजन आणि अनिल कुंबळे बाद झाल्यानंतरही कैफने एका बाजूने किल्ला लढवत भारताला विजय मिळवून दिला. कैफने 75 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी साकारली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामना जिंकल्यानंतर कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानाच्या बाल्कनीत आपली जर्सी काढली. गांगुलीचे हे वर्तन इतिहासात कायमस्वरूपी नोंदवले गेले.