मुंबई - क्रिकेटप्रेमींमध्ये सचिन तेंडुलकर माहीत नसलेला चाहता मिळणे कठीणच. सचिनने आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाचे नाव जगभरात पोहोचले. ३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिनने कराची येथून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराची येथे पहिला कसोटी सामना खेळला होता.
सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यावेळी पाकिस्तान संघामध्ये वसिम अक्रम, इम्रान खानसारखे वेगवान गोलंदाज होते. सचिन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू होता आणि हा विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत ३४ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या.
पदार्पणाच्या सामन्यात सचिनने केल्या 'इतक्या' धावा
सचिनला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात १५ धावा करत्या आल्या. वकार युनूसने सचिनला आऊट केले. या कसोटीत सचिन तेंडुलकरला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली नाही. विशेष बाब म्हणजे, वकार युनूसचा देखील हा पदार्पणाचा सामना होता.