मुंबई- आजच्याच दिवशी २०११ साली प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताने विश्वकरंडकाला गवसणी घातली. महेंद्रसिंह धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराला षटकार ठोकला आणि तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या खेळाडूंनी विजयानंतर दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मानवंदना देताना, त्याला आपल्या खांद्यावर उचलले आणि वानखेडे स्टेडियमला एक फेरी मारली. तेव्हा संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. आज या ऐतिहासिक विश्वविजयाला नऊ वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही तो सामना क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद शतकी (१०३) खेळीच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २७४ धावांची आव्हानात्मक मजल मारली. तेव्हा सेहवाग आणि सचिन लवकर बाद झाल्याने, भारताची अवस्था २ बाद ३१ अशी झाली. यानंतर विराट कोहली (३५) आणि गौतम गंभीर (९७) यांनी भारताचा डाव सावरला.
कोहली-गंभीर या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्मामध्ये असलेल्या युवराजच्या ठिकाणी धोनी मैदानात आला. हा जुगारच होता. कारण संपूर्ण स्पर्धेत धोनीची कामगिरी युवराजपेक्षा सरस नव्हती. धोनी आणि गंभीरने चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागिदारी केली.