ख्राईस्टचर्च - पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने शानदार द्विशतक झळकावले. पहिल्या डावात त्याने ३६४ चेंडूचा सामना करत २३८ धावांची रेकॉर्डब्रेक खेळी केली. विल्यमसनचे हे कारकिर्दीतील चौथे द्विशतक ठरले. यासह त्याने न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमशी बरोबरी साधली. मॅक्युलमने ही ४ द्विशतक झळकावले आहेत. याशिवाय विल्यमसनने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. विल्यमसनने कसोटीत ७ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तो न्यूझीलंडकडून सर्वात वेगाने ७ हजाराचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने ८३ कसोटी सामन्यात ७ हजाराचा टप्पा पार ओलांडला.
या १४ फलंदाजांना विल्यमसनने टाकले मागे
केन विल्यमसनने चौथे द्विशतक झळकावत १४ फलंदाजांना मागे टाकले आहे. त्याने द्विशतकाच्या बाबतीत स्टिव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजारा, जो रुट, अझहर अली, रॉस टेलर, ख्रिस गेल, गॅरी कर्स्टन, व्हीव्हीएन रिचर्डस, स्टिफन फ्लेमिंग, मुशफिकुर रहिम, बॉब सिंपसन, केविन पीटरसन, जस्टिन लँगर आणि सनथ जयसुर्या यांना मागे टाकले आहे. या फलंदाजांनी कसोटीत प्रत्येकी ३ द्विशतके झळकावली आहेत.
विल्यमसनने या खेळाडूंशी साधली बरोबरी
शांत आणि संयमी कर्णधार अशी ओळख असलेल्या विल्यमसनने चौथे द्विशतक झळकावत ९ फलंदाजांशी बरोबरी साधली आहे. या यादीत सुनिल गावसकर, ब्रँडन मॅक्युलम, जहीर अब्बास, मायकल क्लार्क, हाशिम आमला, ग्रेग चॅपल, मोहम्मद युसूफ, गॉर्डन ग्रिनीज आणि लेन हटन यांचा सामावेश आहे. या सर्वांनी त्यांच्या कारकिर्दीत चार द्विशतके केली आहेत.
कसोटीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारे खेळाडू
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेट डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. ब्रॅडमन यांनी कसोटी कारकिर्दीत १२ द्विशतके झळकावली आहेत. ब्रॅडमन यांच्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा याचा या यादीत दुसरा नंबर लागतो. त्याने ११ द्विशतके झळकावली आहेत. ब्रायन लारा ९ द्विशतकासह तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली, वॉली हॅमंड आणि महेला जयवर्धने यांच्या नावे ७ द्विशतके आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी ६-६ द्विशतके ठोकली आहेत. भारताची 'द वॉल' अशी ओळख ठरलेल्या राहुल द्रविडने ५ द्विशतके केली आहेत.
हेही वाचा -श्रीलंकेत पोहोचला इंग्लंडचा संघ... मोईन अलीला झाली कोरोनाची लागण
हेही वाचा -भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे महत्वाचा खेळाडू संघाबाहेर