नेपियर -न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पाकिस्तान संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात पाकने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १७४ धावांचे आव्हान पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले. अखेरचा सामना गमावला असला तरीही न्यूझीलंडने मालिका २-१ ने जिंकली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने आश्वासक सुरुवात केली. तेव्हा हारिस रौफने मार्टिन गुप्टीलला तर फईम अश्रफने सेफर्ट आणि विल्यमसनला माघारी धाडले. तेव्हा डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलीप्स यांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. कॉनवेने ४५ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार लगावत ६३ धावांची खेळी केली. फिलीप्सने त्याला ३१ धावा काढत चांगली साथ दिली. या जोरावर न्यूझीलंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. पाकिस्तानकडून फईम अश्रफने ३, शाहीन आफ्रिदी-हारिस रौफ यांनी प्रत्येकी २-२ बळी टिपले.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या संघाने देखील आश्वासक सुरुवात केली. रिझवान आणि हैदर अली यांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. यानंतर हैदर अली बाद झाला. तेव्हा मोहम्मद हाफीजने पुन्हा एकदा महत्वपूर्ण खेळी करत रिझवानला चांगली साथ दिली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर कुगलेजनने पाकची जोडी फोडली.