ख्राईस्टचर्च - केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १ डाव आणि १७६ धावांनी धुव्वा उडवत २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. या कामगिरीसह न्यूझीलंडचा संघ प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर न्यूझीलंडने मायदेशात सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम देखील आपल्या नावे केला आहे. तसेच न्यूझीलंडने मायदेशात खेळताना मागील १७ सामन्यात अपाराजित होण्याची मालिका कायम ठेवली आहे.
पाकिस्तानने पहिल्या डावात २९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने केन विल्यमसन व हेन्री निकोलस यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. दोघांनी ३६९ धावांची भागिदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. निकोलस २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह १५७ धावा केल्या. दुसरीकडे विल्यमसनने ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावांची खेळी साकरली. डॅरील मिचेलने ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. तेव्हा विल्यमसनने ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडला पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी मिळाली.