ऑकलंड - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला. या पराभावसह भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका देखील गमावली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारताचा डाव २५१ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान, या सामन्यात एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले होते.
सामन्याच्या ३७ व्या षटकात न्यूझीलंडचे सहायक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक लूक राँची क्षेत्ररक्षणसाठी मैदानावर आले होते. कारण, न्यूझीलंड संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. केन विलियम्सन दुखापतीमुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यातून बाहेर आहे. त्यात स्कॉट कुग्गेलेईजनला ताप आला होता तर मिचेल सँटनरच्या पोटात दुखत होते. त्यामुळे राँची यांना बदली खेळाडू म्हणून काही काळ मैदानावर यावे लागले. राँची यांनी २०१७ मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला होता.
नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली. मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी न्यूझीलंडला ९३ धावांची सलामी दिली. दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची मधली फळी कोसळली. तेव्हा अनुभवी रॉस टेलरने पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी ७६ धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडला २७३ धावांपर्यंत मजल मारता आली. टेलरने ७४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली.