हॅमिल्टन - बांगलादेशविरुद्धचा पहिला टी-२० सामना न्यूझीलंडने ६६ धावांची जिंकला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ बाद २१० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला ८ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांची सुरूवात खराब झाली. यानंतर डेवॉन कॉन्वे आणि मार्टिन गुप्टील या दोघांनी डाव सावरला. गुप्टील ३५ धावा काढून बाद झाला. कॉन्वेने दुसरी बाजू लावून धरत आक्रमक फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारासह ९२ धावांची खेळी साकारली. त्याला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या बिल यंगने चांगली साथ दिली. यंगने ३० चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन फिलिप्सने १० चेंडूत २४ धावा चोपल्या.