अबूधाबी - किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल कोरोना महामारीच्याआधी सुसाट फॉर्मात होता. त्याने न्यूझीलंड दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. पण आता त्याने एक आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केलं आहे. माझा ७ महिन्याआधी असलेला फॉर्म कायम राहिल की नाही, याबाबत मला शंका वाटते, असे राहुलनं म्हटलं आहे. मागील काही महिन्यापासून क्रिकेटपासून लांब असल्यानं आयपीएलच्या सुरूवातीला थोडीशी चिंता वाटेल, असेही राहुल म्हणाला.
आयएएनएसशी बोलताना राहुल म्हणाला, 'कोरोनानंतर आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करत आहोत. यामुळे ७ महिन्याआधी जे झाल, त्याचं आता काहीच महत्व नाही. आयपीएलची सुरुवात क्रिकेट न खेळता करत आहोत. यामुळे मला माहिती नाही की, माझा ७ महिन्याआधी असलेला फॉर्म कायम राहिल की नाही. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेआधी आम्ही नर्वस आहोत, हे सांगणे गैर ठरेल. पण आम्ही थोडेसे नर्वस आहोत. आमच्यासमोर कठीण आव्हाने आहेत. असं काही घडेल, याची कोणी कल्पनाही केलेली नसेल.'