मुंबई- पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोनाविरुद्धच्या लढाईत गरजूंना मदत करत आहे. त्याच्या या कामाला युवराज सिंह आणि हरभजन सिंग यांनी पाठिंबा दिला. तसेच त्यांनी आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचे आवाहनही केले. पण, भज्जी आणि युवीचे हे आवाहन नेटिझन्सना आवडले नाही आणि त्यांनी दोघांवर प्रचंड टीका केली. यावर युवीनंतर आता भज्जीनेही टीकाकारांना खडे बोल सुनावले आहे.
भज्जीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत त्याने लिहिले, की 'कोणता धर्म नाही किंवा जात नाही, फक्त मानवता.. घरात सुरक्षित राहा. प्रेम पसरवा, तिरस्कार व व्हायरस नको. प्रत्येकासाठी प्रार्थना करूया.'
हरभजनच्या आधी युवराजनेही टीकाकारांना खडेबोल सुनावले आहे. युवीने या संदर्भात एक ट्विट केले. त्यात तो म्हणतो, 'मला हे कळत नाही, की मी जो मॅसेज केला होता, तो गरजूंना मदत मिळावी यासाठी होता. त्याला चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे. माझा हेतू कोणाच्या भावना दुखवायचा नव्हता. कोरोनामुळे पीडित असलेल्या गरजूंना मदत मिळो, हाच हेतू माझा होता. मी एक भारतीय आहे आणि मी नेहमी मानवतेसाठी उभा राहीन. जय हिंद.'