मुंबई - बीसीसीआयने यंदाच्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ८७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच रणजी करंडकाचे आयोजन केले जाणार नाही. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर, बीसीसीआयने विजय हजारे करंडक स्पर्धेचे, आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी भारताचा माजी सलामीवीर आणि स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू वसीम जाफरने कोविडच्या प्रादुर्भावामुळे विजय हजारे, दुलिप आणि देवधर करंडक या स्पर्धा रद्द कराव्या आणि त्याच्याऐवजी रणजी करंडकाचे आयोजन करावे, अशी मागणी केली होती. पण बीसीसीआयने आता रणजी करंडकाऐवजी विजय हजारे करंडकाच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय ५० षटकांची विजय हजारे क्रिकेट स्पर्धेसह, वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये विनू मांकड एकदिवसीय ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. यासंदर्भात बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले की, 'आम्ही विजय हजारे करंडकासोबत वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. यानंतर विनू मांकड ट्रॉफी अंडर-१९ चे आयोजन करण्यात येईल.'