हैदराबाद - विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीन यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. या सामन्यात मेरी कोमने झरीनचा ९-१ ने पराभव केला. सामन्यानंतर, मेरीने निखतशी 'हँडशेक' धुडकावून लावला. या प्रकरणी क्रीडामंत्री किरेण रिजिजू यांनी आपले मत दिले आहे.
हेही वाचा -'राशिद, आयपीएलमध्ये येताना ती बॅट घेऊन ये!', सनरायजर्स हैदराबादने केले मजेशीर ट्विट
'मेरी आणि निखत यांच्यात घडलेल्या प्रकरणाचे कोणतेही भांडवल करू नये. मेरी कोमचा देशाला अभिमान आहे कारण तिने सहा वेळा भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. मेरी ही एक दिग्गज खेळाडू आहे. जगातील कोणत्याही बॉक्सरने जे काही साध्य केले नसेल ते तिने केले. निखत झरिन एक उत्कृष्ट बॉक्सर आहे, मेरी कोमसारखे बनण्याची क्षमता तिच्याकडे आहे. या दोघींचाही देशाला अभिमान आहे',असे रिजिजू यांनी म्हटले.
सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आता ५१ किलो गटातून भारताकडून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळणार आहे. या प्रकरणानंतर 'मेरीच्या अशा वागण्यामुळे दु:ख झाले, तिने रिंगमध्येही मला अपशब्द वापरले', असे म्हटले आहे. मेरीनेही 'त्यावेळी मी थोडी रागात होते, असे म्हटले आहे.
दरम्यान, निखत झरीनने चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेसाठी संघ निवडताना माझी मेरी कोमशी चाचणी लढत खेळवावी, अशी मागणी केली होती. निखतने क्रीडामत्र्यांनांही याविषयी पत्र लिहिले होते.