माउंट माउंगानुई-न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना माउंट माउंगानुई येथे खेळला जात आहे. यजमान न्यूझीलंड संघाने या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २२२ धावा केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन ९४ तर हेन्री निकोलस ४२ धावांवर नाबाद आहेत.
उभय संघातील बॉक्सिंग डे सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पाकच्या गोलंदाजांनी टॉम लॅथम (४) आणि टॉम ब्लंडल (५) यांना झटपट बाद करत चांगली सुरूवात केली. शाहीन शाह आफ्रिदीने या दोघांना माघारी धाडलं. यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवले. विल्यमसन आणि रॉस टेलर या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२० धावांची भागिदारी रचत संघाला सुस्थितीत आणले. टेलर ७० धावांवर बाद झाला. त्याची विकेटही आफ्रिदीनेच घेतली.