पल्लेकल -फलंदाज कॉलिन डी ग्रँडहोमच्या ५९ धावा आणि टॉम ब्रूसच्या ५३ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने लंकेवर ४ विकेट्सने मात केली आहे. पल्लेकल येथे रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने २ चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत २-०ने आघाडी घेतली.
हेही वाचा -जे कोणत्याही भारतीयाला जमले नाही ते मलिंगाने करुन दाखवले
न्यूझीलंडच्या या दोन फलंदाजांनी १०३ धावांची भागीदीरी रचली. लंकेच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ६ विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात त्यांनी सलामीवीर कोलिन मुनरोला १३ धावांवर बाद करत धक्का दिला. धनंजयने त्याला बाद केले. त्यानंतर, धनंजयने आपल्या दुसऱ्याच षटकात स्कॉट कगीलेन आणि टीम सीफर्टला तंबूत धाडले. त्याने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडवर दबाव वाढत असताना कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम ब्रूस मदतीसाठी धावून आले. त्यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजयासमीप पोहोचवले. ग्रँडहोमने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार लगावले. हसरंगा डि सिल्वाच्या शेवटच्या षटकात मिचेल सँटनरने लगावलेल्या दोन षटकार आणि एका चौकारामुळे न्यूझीलंडला हा विजय साकारता आला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या लंकेने फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत ९ गडी गमावत १६१ धावा केल्या होत्या. लंकेतर्फे अविष्का फर्नांडो ३७ धावा आणि निरोशन डिकवेला ३९ धावा यांनी उपयुक्त योगदान दिले. गोलंदाजी करताना कर्णधार साऊदीने २ विकेट्स घेत सामनावीराचा मान पटकावला.