नवी दिल्ली - न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी झालेल्या एका सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. केंटरबरी संघाच्या कार्टरने स्थानिक टी-२० स्पर्धेत नॉर्दर्न नाईट्स विरुद्ध हा पराक्रम केला. त्याने नाईट्सचा फिरकीपटू अँटोन डेवसिचविरुद्ध सामन्याच्या १६ व्या षटकात ६ षटकार ठोकले.
हेही वाचा -अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉईनिसला साडे पाच लाखांचा दंड!
लिओ कार्टर असा विक्रम करणारा जगातील ७ वा खेळाडू ठरला आहे. कार्टर व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, भारताचे रवी शास्त्री आणि युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स, इंग्लंडचा रॉस विटेली आणि अफगाणिस्तानचा हजरतुल्ला जाझाई यांनी एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा कारनामा केला होता. २००७ मधील टी-२० विश्वकंरडक स्पर्धेत भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध ६ षटकार ठोकले होते.
केंटरबरीने हा सामना ७ गडी राखून जिंकला -
सामन्यात नॉर्दन नाईट्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना, केंटरबरीने ७ गडी राखून हा सामना जिंकला. सामन्यात कार्टरने २९ चेंडूत ७० धावा कुटल्या आहेत.