हॅमिल्टन -भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कवर तिसरा टी-२० सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताने ५ गडी गमावत १७९ धावा केल्या आणि यजमान संघाला १८० धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडने नाणेफक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या जोडीने भारताला ८.६ षटकात ८९ धावांची दमदार सलामी दिली. रोहितने २३ चेंडूत आपले अर्धशतक साकारले. त्याने बेनेटच्या पाच चेंडूवर २६ धावा कुटल्या. फॉर्मात असलेला राहुल २७ धावांवर बाद झाला. त्याने ग्रँडहोमेने माघारी धाडले. राहुल बाद झाल्यानंतर, विराटऐवजी युवा शिवम दुबे फलंदाजीला आला. रोहित ३९ चेंडूत केलेल्या ६५ धावांच्या झटपट खेळीनंतर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. रोहितनंतर शिवमही माघारी परतला. या दोघांना बेनेटने तंबूत धाडले. झटपट तीन विकेट्स पडल्यावर भारताची धावसंख्याही मंदावली. त्यानंतर, विराट आणि श्रेयस अय्यरने थोडासा प्रतिकार केला. विराट ३८ धावांवर बाद झाला. त्याचा साऊदीने अप्रतिम झेल टिपला. अय्यरने १७ धावा जोडल्या. हे दोघे बाद झाल्यावर मनीष पांडे आणि रविंद्र जडेजाने संघाची धावसंख्या पावणेदोनशेच्यावर पोहोचवली. न्य़ूझीलंडकडून बेनेटने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर, सँटनर आणि ग्रँडहोमेला प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.
आजच्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंड भूमीत पहिल्या मालिका विजयाची संधी भारताला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. विल्यम्सनने मात्र, टिकनरच्या जागी स्कॉट कुगेलेइनला संघात स्थान दिले आहे.
हेही वाचा -इरफानच्या 'त्या' कारनाम्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली!
ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने सहज विजय नोंदवला. हे सामने भारताने अनुक्रमे सहा आणि सात गडी राखून जिंकत २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तोच फॉर्म कायम राखण्यासाठी विराटसेना प्रयत्न करणार आहे.