वेलिंग्टन - येथील बेसिन रिझर्व मैदानावर भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात सावधपणे केली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ १४ धावा करून माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराने सावध खेळीची रणनीती अवलंबली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ४ बाद १४४ धावा अशी आहे.
हेही वाचा -आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवी दाहियाला सुवर्ण पदक
या डावात मयांकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ७ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. मयांकला साऊथीने माघारी धाडले. तर, पुजाराचा बोल्टने त्रिफळा उडवला. कर्णधार विराट कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो या डावातही अपयशी ठरला. १९ धावांवर बोल्टने त्याला माघारी धाडले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उपकर्णधार अजिंक्य रहाणे २५ आणि हनुमा विहारी १५ धावांवर खेळत असून भारत अद्याप ३९ धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ बळी घेतले आहेत.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी ५ बाद २१६ धावांवरुन पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडचे बी.जे. वॉट्लिंग (१४ धावा) आणि टिम साऊथी (७) झटपट बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही असे वाटत असताना आठव्या क्रमांकावर आलेल्या नवख्या काईल जेमिसन आणि कॉलिन डी ग्रँडहोमे यांनी भारताचे मनसुबे उडवून लावत आठव्या विकेटसाठी ७१ धावांची चिवट भागिदारी केली. भारताकडून इशांत शर्माने न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद केला. त्याने ६८ धावांत ५ बळी घेतले. तर, फिरकीपटू अश्विनने ३ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.
संक्षिप्त धावफलक -
- नाणेफेक - न्यूझीलंड (गोलंदाजी)
- भारत पहिला डाव - ६८.१ षटकात सर्वबाद १६५ (मयांक अग्रवाल ३४, अजिंक्य रहाणे ४६; टीम साऊथी ४९/४, काईल जेमिसन ३९/४)
- न्यूझीलंड पहिला डाव - १००.२ षटकात सर्वबाद ३४८ (केन विल्यम्सन ८९, रॉस टेलर ४४, काईल जेमिसन ४४, ट्रेंट बोल्ट ३८; इशांत शर्मा ६८/५)
- भारत दुसरा डाव - ६५ षटकात ४ बाद १४४* (मयांक अग्रवाल ५८; ट्रेंट बोल्ट २७/३)