वेलिंग्टन - बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा संघ पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात बांगलादेशाचा पहिला डाव २११ धावांवर आटोपल्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने ६ गडी गमावत ४३२ धावा केल्या. अनुभवी फलंदाज रॉस टेलरने २०० धावांची द्विशतकी तर हेन्री निकोल्सने १०७ धावांची शतकी खेळी करत न्यूझीलंडची धावसंख्या चारशेपार नेली. या दोघांशिवाय कर्णधार केन विलियमसननेही ७४ धावांची खेळी केली.
'रॉस' द 'बॉस'ने झळकावले द्विशतक, बांगलादेश पराभवाच्या छायेत - 141 runs
अनुभवी फलंदाज रॉस टेलरने २०० धावांची द्विशतकी खेळी
न्यूझीलंडने ४३२ धावांवर आपला डाव घोषित केल्यानंतर आपला दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने ३ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा केल्या आहेत. बांगलादेशचा संघ अजूनही १४१ धावांनी पिछाडीवर आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी ७ विकेट्सची गरज असणार आहे. पावसामुळे या सामन्यातील पहिले दोन दिवस खेळ होऊ न शकल्याने तिसऱ्या दिवशी रविवारी खेळास सुरुवात झाली होती.
३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरेल.