हॅमिल्टन - भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. किवीच्या खेळाडूंसह न्यूझीलंडचे मंत्रीही या पराभवाने निराश झाले आहेत. न्यूझीलंडच्या क्रीडा मंत्र्याने तर सुपर ओव्हरला बॅन करणारा प्रस्तावच आणणार असल्याचे ट्विट केलं आहे.
न्यूझीलंडने आजघडीपर्यंत ७ वेळा सुपर ओव्हरमध्ये सामना खेळला आहे. यात एकाच सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवता आला आहे. राहिलेल्या ६ सामन्यात किवींना पराभवाचे तोंड पाहावे लागले. दरम्यान, इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामनाही सुपर ओव्हरमध्ये गेला होता. न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी समान धावा केल्या. तेव्हा चौकाराच्या निकषाच्या जोरावर इंग्लंडला विजेता ठरवण्यात आले. सुपर ओव्हरमुळे पराभव होण्याची ही जखम ताजी असतानाच, भारताकडून न्यूझीलंडला पुन्हा सुपर ओव्हरमध्येच पराभूत व्हावे लागले आहे.
सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवाने, न्यूझीलंडचा संघ प्रचंड निराश झाला आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचे क्रीडा मंत्री ग्रांट रॉबर्टसन यांनी एक ट्विट केले आहे. न्यूझीलंडमध्ये मानसिक आरोग्य आणि भल्यासाठी तत्काळ सुपर ओव्हरवर बंदी घालणारे एक विधेयक आणण्यात येईल, अशा आशयाचे ट्विट रॉबर्टसन यांनी केले आहे. रॉबर्टसन यांच्या ट्विटवरुन न्यूझीलंडचा पराभव तिथल्या लोकांच्याही किती जिव्हारी लागला आहे, हे दिसून येते.
दरम्यान, रॉबर्टसन यांनी हे ट्विट मस्करीत केले असून नेटकऱ्यांकडूनही त्यावर खुमासदार प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केन विल्यम्सनच्या खेळीचे कौतूक केले आहे.