वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा केली आहे. यात न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसनला दुखापत झाल्याने, संघाची कमान टॉम लाथम याच्याकडे सोपविण्यात आली आहे.
केन विल्यमसनच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे तो बांगलादेशविरूद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. याकारणाने न्यूझीलंड संघाची धुरा लाथमकडे सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड बोर्डाने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवार (२० मार्च) रोजी डुनेडिन येथील मैदानावर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्याची टी-२० मालिका देखील होणार आहे.