कोलकाता - कोरोना विषाणूमुळे पश्चिम बंगाल राज्य बंद स्थितीत आहे. या व्हायरसमुळे अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही आपले शहर बंद झाल्यामुळे प्रतिक्रिया दिली. 'माझे शहर असे दिसेल कधीही वाटले नाही. सुरक्षित राहा. लवकरच चांगले होईल. आपणा सर्वांवर माझे प्रेम आहे', असे ट्विट करत गांगुलीने आपली भावना व्यक्त केली.
हेही वाचा -प्रशंसनीय!..कोरोनाग्रस्तांसाठी भारताच्या कुस्तीपटूने दिले सहा महिन्यांचे मानधन
या ट्विटसोबत गांगुलीने काही फोटोही पोस्ट केले आहेत. संपूर्ण कोलकातासह पश्चिम बंगालच्या मोठ्या भागात संपूर्ण लॉक डाउन सुरू होताच पोलिस कर्मचार्यांनी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना पळवून लावले. संपूर्ण कोलकाता आणि आठ जिल्हे कोरोना व्हायरस संक्रमणाच्या प्रसाराशी झगडत आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेसंदर्भात आज (मंगळवार) बीसीसीआय आणि आठही फ्रँचायझी मालकांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक होणार होती. पण ती बैठक रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी कोरोनाची परिस्थिती सुधारली तर ठीक अन्यथा आयपीएल रद्द करावे लागले तरी हरकत नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे आयपीएल होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.