मुंबई - भारताचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या एका फोटोवरून ट्रोल होत आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर रोहित, रितिका आणि त्यांची मुलगी समायराचा विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून रोहित त्याच्या पत्नीसह ट्रोल झाला आहे.
आयपीएलच्या तेराव्या पर्वासाठी रोहित सहकुटुंब यूएईला जात आहे. त्यासाठी रोहितने मुंबईचे विमानतळ गाठले. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या टोमध्ये तो आणि त्याची पत्नी रितिकाने पीपीई किट घातला आहे. मात्र, कोरोनाकाळात मुलगी समायराला कोणतीच सुरक्षा न पुरवल्याने नेटकऱ्यांनी रोहित आणि रितिकाला खूप ट्रोल केले.
आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. २०१९च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला एका धावेने हरवून चौथ्यांदा विजेतेपद जिंकले. रोहितने मागील मोसमात २८ सामन्यात २८.९२च्या सरासरीने ४०५ धावा केल्या. आयपीएलमध्ये रोहितने १८८ सामन्यांमध्ये ३१.६०च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. रोहितने आयपीएलमध्ये १ शतक आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत.
आयपीएल स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर काही संघ यूएईमध्ये दाखलही झाले आहेत. गुरूवारी सकाळी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ यूएईमध्ये दाखल झाला आहे.