पोखारा -नेपाळची महिला क्रिकेटपटू अंजली चंदने सोमवारी एकही धाव न देता टी-२० मध्ये ६ विकेट्स घेण्याची किमया केली. नेपाळ आणि मालदीव यांच्यात झालेल्या सामन्यात अंजलीने हा पराक्रम केला. या विक्रमासहसह अंजली टी-२० मधील महिला आणि पुरुष या दोघांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरली आहे.
हेही वाचा -थरारक!..शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कर्नाटक विजयी
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मालदीवला केवळ १६ धावा करता आल्या. नेपाळने हे लक्ष्य ५ चेंडूतच पूर्ण केले. सातव्या षटकात अंजलीने ३ तर नवव्या षटकात २ गडी बाद केले. डावाच्या ११ व्या षटकात तिने अजून एक बळी घेत मालदीवच्या डावाचा अंत केला. अंजलीने संपूर्ण सामन्यात केवळ १३ चेंडू फेकले आहेत.
यासह अंजलीने महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी मालदीवच्या मॅस इलियासाने यावर्षी चीनविरुद्ध ३ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. टी-२० मधील पुरुषांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजाचा मान भारताच्या दीपक चाहकडे असून त्याने १० नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध २.२ षटकांत ७ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या.