कार्तिपूर- आयसीसीच्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग टू मध्ये नेपाळ संघाने अमेरिकेला ३५ धावांमध्ये गुंडाळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. संदीप लॅमिछानेने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या.
नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले. नेपाळच्या गोलंदाजीसमोर अमेरिकेचा संघाचा डाव १२ षटकात अवघ्या ३५ धावसंख्येवरच संपुष्टात आला. अमेरिकेच्या जेवियर मार्शलने सर्वाधिक १६ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. संदीप लामिछानेने ६ षटकात १६ धावा देत ६ तर सुशान भरी याने ३ षटकात ५ धावा देत ४ गडी बाद केले.
विजयासाठीचे ३६ धावांचे आव्हान नेपाळने ५.२ षटकात २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. ६ गडी बाद करणारा संदीप सामनावीर ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम आता अमेरिकेच्या नावावर नोंदवला गेला आहे. याआधी हा विक्रम झिम्बब्वेच्या नावावर होता. त्यांनी २००४ मध्ये ३५ धावा केल्या होत्या. पण त्यासाठी झिम्बाब्वेने १८ षटके खेळली होती. आजच्या सामन्यात अमेरिकेचा संघ १२ षटकातच ढेर झाला.