मुंबई -सौरव गांगुली प्रत्येक वेळी मला नाणेफेकीच्या वेळी वाट पाहायला लावायचा, असे इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासिर हुसेनने म्हटले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि नासिर हुसेन हे मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले मित्र म्हणून ओळखले जातात.
एका कार्यक्रमात हुसेन म्हणाला, ''गांगुलीने भारताला एक मजबूत संघ बनवला असल्याचे मी यापूर्वी बोललो आहे. तो संघ खूप विनम्र होता. सर्वजण चांगले वागायचे. गांगुलीच्या संघाविरूद्ध खेळत असताना, तुम्ही कठीण सामना करत आहात हे आपल्याला माहिती असायचे. तो खूप सामर्थ्यवान होता. तो उत्कृष्ट क्रिकेटपटू निवडत असे. जेव्हा तो सामना संपल्यावर भेटायचा तेव्हा तो खूप चांगला वागत होता.''
हुसेन पुढे म्हणाला, "जेव्हा मी गांगुली विरुद्ध खेळायचो, तेव्हा मी त्याचा द्वेष करायचो. कारण तो प्रत्येक वेळी मला नाणेफेकीसाठी वाट पाहायला लावायचा. मी त्याला म्हणायचो, की गांगुली 10:30 झाले आहेत, आपल्याला नाणेफेकीसाठी जावे लागेल. मी त्याच्यासोबत दहा वर्षे समालोचन करत आहे. तो एक हुशार व्यक्ती आहे. पण, तो समालोचनाच्या वेळीही उशीर करतो."
मागच्या महिन्यातील 20 जूनला गांगुलीच्या कसोटी पदार्पणाला 24 वर्षे पूर्ण झाली. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने 131 धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा 10 वा फलंदाज ठरला. गांगुलीने 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेरच राहिला.
गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.