मुंबई - आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अद्याप एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. तेराव्या हंगामात प्ले ऑफमध्ये बंगळुरूचे आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने तेराव्या हंगामाचे विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. कर्णधार म्हणून रोहितचे हे पाचवे तर खेळाडू म्हणून सहावे विजेतेपद ठरले. या स्पर्धेनंतर भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराटच्या जागेवर रोहितची नेमणूक व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक माजी खेळाडूंनी केलेल्या मागणीला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननेही सहमती दर्शवली आहे.
काय म्हणाला हुसेन...
नासिर हुसेन म्हणाला की, आता विराटची टी-२०चे कर्णधारपद सोडण्याची वेळ आलेली आहे. रोहितने आता भारतीय संघाचे नेतृत्त्व करावे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये केलेला विक्रमच याची साक्ष देत आहेत.
या घटनेचा दिला दाखला...
रोहितची कर्णधारपदाची शैली तसेच मैदानात त्याचे डोके शांत ठेवून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य चांगले असल्याचे हुसेन याने सांगितले. याचा दाखला देत त्याने, अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवसोबत झालेल्या गोंधळानंतर रोहितने ज्या पद्धतीने स्पष्टिकरण दिले ते पाहता रोहित प्रलग्भ कर्णधार आहे, याची जाणीव होते, असे सांगितले.
याशिवाय तो म्हणाला, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित सध्याच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर द्विशतकांची नोंद असल्याचे सांगितले.
रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेनंतर भारतात परतला आहे. तर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. रोहित कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाणार आहे.
हेही वाचा -Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विराटचा तिरस्कार करणे पसंत करतात - टिम पेन
हेही वाचा -माझ्याविरोधात शॉर्टपिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर पचतावचाल, स्मिथने भारतीय गोलंदाजांना डिवचलं