कराची -पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा सर्वात कमी वयाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. येथील नॅशनल स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी नसीमने ही कामगिरी केली. त्याने ३१ धावा देत लंकेचा अर्धा संघ गारद केला.
हेही वाचा -IPL २०२० : ४८ वर्षीय प्रविण तांबेचे आयपीएल स्वप्न भंगणार
हा विक्रम नोंदवताना नसीमचे वय १६ वर्षे आणि ३०७ दिवस होते. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या नावावर होता. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी ५ बळी घेण्याची किमया केली होती. तर फिरकीपटू म्हणून सर्वात कमी वयात ५ बळी नोंदवण्याचा विक्रम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू नसीम उल गनी यांच्या नावावर आहे. त्यांनी १९५८ मध्ये १६ वर्षे ३०३ दिवस असे वय असताना विंडीजविरूद्ध ही कामगिरी नोंदवली होती.
पाकिस्तानने दुसरी कसोटी २६३ धावांनी जिंकत दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने खिशात घातली आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.