नवी दिल्ली - भारताच्या राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) डोप टेस्टिंग प्रोग्रामला अंतिम रूप दिले आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग असलेली आयपीएल यंदा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईमध्ये होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यूएईमध्ये नाडाने पाच 'डोप कंट्रोल स्टेशन' अर्थात डीसीएस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचपैकी तीन डीसीएस लीगचे सामने होणाऱ्या मैदानावर तयार केले जातील. याखेरीज आयसीसी अकादमी, दुबई आणि शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी या प्रशिक्षण मैदानासाठी प्रत्येकी एक केंद्र सुरू केले जाईल.
नाडाचे संचालक नवीन अग्रवाल यांनी म्हटले, की डोप कंट्रोल अधिकाऱ्यांना खेळाच्या ठिकाणी 'स्पर्धा' चाचणी करण्यास सांगितले गेले आहे, तर प्रशिक्षण जागेवर 'स्पर्धेबाह्य' चाचणी काटेकोरपणे केली जाईल. या स्पर्धेदरम्यान क्रिकेटपटूंचे ५० नमुने गोळा केले जातील.
अँटी-डोपिंग प्रोग्रामसाठी नाडाचे अधिकारी आणि डीसीओचे तीन संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात एकूण पाच सदस्य असतील. यात नाडाचे एक अधिकारी, दोन डीसीओ आणि यूएईच्या अँटी-डोपिंग मंडळाचे दोन सदस्य असतील.
हे तीन संघ यूएईमध्ये पोहोचतील. पहिला संघ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रवाना होईल. त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. यानंतर यूएईमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची पुन्हा कोरोनाद्वारे चाचणी होईल. आयपीएल दरम्यान चाचणी, राहण्याची व्यवस्था आणि स्थानिक प्रवासाचा खर्च बीसीसीआय उचलेल. यूएईपर्यंत पोहोचण्याचा खर्च नाडालाच करावा लागणार आहे.