मेलबर्न- मी जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळत होतो, तेव्हा सचिन तेंडुलकरपेक्षा दुसरा सर्वोत्तम फलंदाज पाहिला नाही. सचिन इतका परफेक्ट होता की त्याला बाद करणे अवघड असायचे. त्याच्या फलंदाजीत कोणताही दोष नव्हता, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी यशस्वी कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले. क्लार्कने सचिनची छबी विराट कोहलीमध्ये दिसत असल्याचे, सांगत कर्णधार कोहलीचे कौतूक केले.
क्लार्कने एका क्रीडा रेडिओ शो दरम्यान बोलताना सांगितले की, 'मी माझ्या करिअरमध्ये जेवढे फलंदाज पाहिले. त्यामध्ये सचिनपेक्षा सर्वोत्तम कोणीच नाही. सचिला आऊट करणे अतिशय अवघड असायचे. कारण, त्यांच्या फलंदाजीत कोणताही दोष नव्हता. सचिन फलंदाजीला आल्यावर त्याच्याकडून चूक होण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसायचा.'
विराट कोहली आणि सचिनची तुलना करत क्लार्कने सांगितले, 'सचिन आणि विराट मध्ये एक गोष्ट समान आहे. या दोघांना मोठी खेळी करताना शतक झळकावण्यास आवडते. विराट सध्या क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वोत्तम फलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये त्याचे विक्रम शानदार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये देखील तो दबदबा निर्माण करत आहे.'