मुंबई - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने पाकिस्तान दौऱ्यादरम्यान जावेद मियांदादने केलेल्या वक्तव्यामुळे वडिल खूप निराश झाल्याचे उघड केले आहे. 2003-04 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान दौरा केला होता आणि मियांदाद त्यावेळी पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होता. इरफानसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या गल्लीगल्लीत आहेत, असे मियांदादने म्हटले होते.
मियांदादच्या या वक्तव्यानंतर पठाणचे वडिल निराश झाले होते. मालिका संपल्यानंतर त्यांना ड्रेसिंग रूममध्ये मियांदादला भेटायचे होते. इरफान एका कार्यक्रमात म्हणाला, ''माझे वडिल आणि मीसुद्धा या वक्तव्याबद्दल वाचले होते. आम्हाला ते आवडले नाही. मला आठवते मालिकेच्या शेवटच्या सामन्यात माझे वडिल पाकिस्तानात आले होते. त्यांना मियांदादला पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये भेटायचे होते आणि मी त्यांना म्हणालो होतो, की तुम्ही तेथे जाऊ नका.''