नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिमने आगामी आयपीएल हंगामाच्या लिलावातून माघार घेतली आहे. कोलकाता येथे १९ डिसेंबरला आयपीएलचा लिलाव पार पडणार असून या लिलावाआधी रहिमने माघार घेतली.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या मोसमासाठी एकूण ९७१ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक निवेदनाद्वारे या विषयी माहिती दिली. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ होती. आता या महिन्याच्या १९ तारखेला कोलकातामध्ये लिलाव होणार आहे.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या अशा एकूण १९ भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या अशा ६३४ अशा भारतीय खेळाडूचाही लिलाव होणार आहे. यात ६० खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएलचा अनुभव आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या १९६ विदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर असे ६० परदेशी खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप खेळलेले नाहीत. या लिलावासाठी ऑस्ट्रेलियाचे ५५, दक्षिण आफ्रिकेचे ५४, श्रीलंकाचे ३९, न्यूझीलंडचे २४, इंग्लंडचे २२, वेस्ट इंडीजचे ३४, अफगाणिस्तानचे १९, बांग्लादेशचे ६, झिम्बाब्वेचे ३, नेदरलँड्स व अमेरिकेचा प्रत्येकी एक इत्यादी खेळाडूंनी नोंदणी केली आहे.