मुंबई -आयपीएलच्या रणसंग्रामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. सलग पराजयाची मालिका खंडित करून विजयी मार्गावर परतलेल्या कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्ससमोर मुंबई इंडियन्सचे 'चॅलेंज' असणार आहे.
हा सामना आज रात्री ८ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सत्रातील दोन्ही संघाचा हा आठवा सामना असणार आहे. यात मुंबईला ४ तर बंगळुरूला केवळ १ सामना जिंकण्यात यश आले आहे. पहिल्या ६ सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या बंगळुरूच्या संघाने सातव्या सामन्यात पंजाबवर ८ गडी राखून विजय मिळवत खाते खोलले होते.
यंदाच्या सत्रातील मुंबई आणि बंगळुरू यांचा हा दुसरा सामना असून यापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईने बंगळुरूवर ६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात मुंबईने बंगळुरूपुढे १८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, बंगळुरुला निर्धारीत २० षटकात ५ बाद १८२ धावापर्यंतच मजल मारता आली.
आजच्या सामन्याचा विचार केला असता, मुंबईच्या फलंदाजीची धुरा ही प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मासह, क्विंटन डीकॉक, हार्दिक पंडय़ा आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर राहील. तर बंगळुरूची जबाबदारी कर्णधार विराट कोहली, एबी. डी. व्हिलियर्स, पार्थिव पटेल यांच्यावर असणार आहे. मुंबईला आपल्या मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
मुंबईच्या गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमरा, लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे आणि मिचेल मॅक्क्लिनॅघनवर असेल तर बंगळुरूची जबाबदारी प्रामुख्याने उमेश यादव, मोईन अली आणि यजुर्वेद्र चहल याच्यांवर असणार आहे.
मुंबई इंडियन्स -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंड, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, ऍडम मिलने, जेसन बेरेन्डॉन्फ, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत, बरिंदर स्त्रान, पंकज जयस्वाल, रसीख सलाम, युवराज सिंग, जयंत यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -विराट कोहली (कर्णधार), एबी. डी. व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, स्टेन गन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.