मुंबई- इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक महेद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. तो आयपीएलद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. त्यासाठी त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव सत्राला हजेरीही लावली होती. पण, आता आयपीएलवर कोरोनाचे सावट आहे. यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची तयारी केली असल्याचे समजते.
एका क्रीडा संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार, धोनीने आपला परिवार आणि जवळच्या मित्रांना आपल्या निवृत्तीविषयी सांगितल्याची माहिती मिळत आहे. मात्र आयपीएलचे पुढील दोन हंगाम तरी धोनी खेळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, धोनीची अद्याप बीसीसीआयशी अधिकृत बोलणी केलेली नाही. पण आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना त्याने आपले मन मोकळे केले आहे. योग्य वेळ येताच तो आपली निवृत्ती जाहीर करेल.
दरम्यान, यंदाच्या हंगामातील आयपीएलबद्दल अंतिम निर्णय येईपर्यंत तो निवृत्तीचा निर्णय घेईल, याची शक्यता कमी आहे.