नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाची तारीख निश्चित झाली आहे. आगामी आयपीएलच्या हंगामासाठी धोनी मार्चच्या महिन्यात सरावाला उतरणार असल्याचे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले.
हेही वाचा -जिथे क्रिकेटचा देवही होतो नतमस्तक.. विक्रमांचा बादशहा, 'नाईटहूड' आणि बरंच काही..
२९ मार्चपासून रंगणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. '३८ वर्षीय धोनी ३ किंवा ४ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामासाठी सरावाला सुरुवात करेल. सीएसकेचे प्रशिक्षण शिबिर १९ मार्चनंतरच सुरू होईल. जे खेळाडू उपलब्ध आहेत ते धोनीबरोबर सरावात सामील होतील', असे विश्वनाथन यांनी म्हटले आहे.
या हंगामाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार असून १७ मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील खेळाडूंच्या यादीमध्ये धोनीला स्थान मिळालेले नाही.