हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी खेळाडूंशी करार केला आहे. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कोठेही स्थान देण्यात आलेले नाही. धोनीला मागील वर्षी केलेल्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयने धोनीला करारमुक्त करुन धोनीने निवृत्ती घ्यावी, असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.
गुरूवारी बीसीसीआयने मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांच्याशी करार करण्यात आले असल्याचे जाहीर केले. बीसीसीआयने करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली असून या करार यादीतून धोनीला वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी धोनीला 'अ' श्रेणीत स्थान देण्यात आले होते. पण या वर्षी त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.