मुंबई - जगातला सर्वोत्तम बेस्ट फिनशर म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनी एक नवा विश्वविक्रम करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरला मागे टाकून धोनी सर्वाधिक डावात यष्टीरक्षण करणारा खेळाडू ठरणार आहे.
धोनीने क्रिकेटच्या तीनही प्रकारात मिळून आतापर्यंत ५२४ सामन्यातील ५९४ डावात यष्टीरक्षण केले आहे. २ सामने खेळल्यानंतर त्याच्या नावावर सर्वाधिक सामन्यात यष्टीरक्षण करण्याचा विक्रम जमा होईल.
मार्क बाऊचरने (५९६) डावात यष्टीरक्षण केले आहे. त्यानंतर धोनी (५९४), श्रीलंकेचा कुमार संगक्कारा (४९९), ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने (४८५) सामन्यात यष्टीरक्षण केले आहे.
कर्णधारपदाची धुरा जरी दुसऱ्यावर सोपवली असली तरी यष्टीमागे ऊभा राहून धोनीच सामन्याची सुत्रे हलवत असतो. त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. आयसीसीच्या तीन्ही ट्रॉफी जिंकण्याचा जगातला पहिला खेळाडू आहे. यष्टीरक्षणात त्याचा खूप मोठा दबदबा आहे. सर्वाधिक १९१ फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर जमा आहे.
मागील वर्षी धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही शेवटची मालिका असू शकते. त्यानंतर आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी धोनीला विश्रांती देखील देण्यात येऊ शकते. जर असे झाल्यास त्याचा विक्रम लांबणीवर पडू शकतो.