मुंबई- भारतीय संघाचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, महेद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदावरुन धक्कादायक विधान केले आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. या विजयी संघाचा युवी सदस्य होता. महत्वाचे म्हणजे युवी त्या विश्वकरंडकाचा मालिकावीर खेळाडू ठरला होता. असे असून देखील युवीने धोनीबद्दल धक्कादायक विधान केल्याने, क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.
युवराजने २००० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आपल्या १९ वर्षांच्या करिअरमध्ये ४०२ आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले. १० जून २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युवराजने खळबळजनक खुलासा केला. या मुलाखतीमध्ये त्याला 'तुझ्या करिअरमधील सर्वोत्तम कर्णधारविषयी काय सांगशील', असे विचारले असताना तो म्हणाला, 'सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली मी क्रिकेट खेळलो. त्याने मला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. यासाठी गांगुलीचे कर्णधारपद माझ्या लक्षात राहिले. इतका पाठिंबा महेंद्रसिंह धोनी अथवा त्यानंतर विराट कोहलीकडून मिळाला नाही.'