नवी दिल्ली -भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना स्टेनने हा खुलासा केला. एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्टेनने जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या प्रत्युत्तरात शमीचे नाव घेतले.
हेही वाचा -बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट
इंदोरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शमीने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते.
गोलंदाज मोहम्मद शमीने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान गाठले आहे. गोलंदाजांच्या यादीत शमीने आठ स्थानांची झेप घेत सातवे स्थान गाठले आहे. शमीच्या खात्यात ७९० गुण आहेत. सर्वाधिक गुण मिळवणारा तो तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी कपिल देवने ८७७ आणि जसप्रीत बुमराह ८३२ गुण मिळवले आहेत.