कराची - पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजने, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेनंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ३९ वर्षीय हाफिजने शुक्रवारी यांची घोषणा केली. दरम्यान, मागील काही महिन्यानंतर संघाबाहेर असलेल्या हाफिजची २४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.
मोहम्मद हाफिजने २००३ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हाफिजने ५५ कसोटी सामने खेळली असून त्याने डिसेंबर २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २१८ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ६६१४ धावा केल्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने १३९ गडी बाद केले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये ८९ सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करताना हाफिजने १९०८ धावा केल्या आहेत. तर त्यासोबत त्याने ५४ गडीही बाद केले आहेत.