नवी दिल्ली -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या भाषणावरून फार चर्चेत आले. भाषणातील काश्मीर मुद्द्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने इम्रान खान यांच्यावर सडकून टीका करताना इम्रान खान दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल' आहेत, असे म्हटले होते. आता अजून एका क्रिकेटपटूने इम्रान खान यांना धारेवर धरले आहे.
हेही वाचा -अश्विन-जडेजामुळे आम्हाला आराम मिळतो - मोहम्मद शमी
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याने एका लेखामध्ये इम्रान खान यांच्यावर टीका केली. 'हो, तुमचा पाकिस्तान देश हा दहशतवाद्यांचे सुरक्षित पैदास केंद्र आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेले भाषण हे दुर्भाग्यपूर्ण होते. क्रिकेटपटू ते पाक सैन्याचे बाहुले हा तुमचा प्रवास अत्यंत वाईट आहे.'
संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणानंतर इम्रान खान यांच्यावर सौरभ गांगुलीनेही ताशेरे ओढले होते. वीरेंद्र सेहवागने केलेल्या ट्विटवर उत्तर देताना गांगुलीने इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. 'इम्रान आता पूर्वीचे राहिलेलेल नाहीत. असे भाषण ऐकून मला धक्का बसला. जगाला शांतता हवी आहे आणि पाकला त्याची सर्वात जास्त गरज आहे. मात्र, त्यांचा हा नेता असे भाषण करत आहे.'
इम्रान खान पाकिस्तानचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिल्यांदा १९९२ साली विश्वकरंडक जिंकला. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काश्मीरमधून निर्बंध हटवल्यानंतर तिथे मोठा हिंसाचार होईल, असे वक्तव्य इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना केले होते. त्यांनी अण्वस्त्र वापरण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही दिला. त्यांची ही भाषा युद्धखोरीची असल्याची जोरदार टीका होत आहे.