लाहोर -पाकिस्तानचा स्थानिक खेळाडू फजल शुभनचा पिक अप गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सर्वांनीच धारेवर धरले. या प्रकरणी आता पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हफीजने पीसीबीवर ताशेरे ओढले आहेत.
हेही वाचा -'पाकिस्तानातील हॉटेलमध्ये बंद राहून आम्ही कंटाळलो होतो', लंकेच्या अध्यक्षाचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तानच्या एका पत्रकाराने क्रिकेटपटू फजल शुभनचा पिक अप गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओमुळे तेथील क्रिकेटपटूंचा जगण्यासाठीचा संघर्ष सर्वांसमोर आला. या प्रकरणी मोहम्मद हफीजने ट्विट केले. 'ही खुप वाईट गोष्ट आहे. फजल शुभनसारखे अनेक खेळाडू त्रस्त आहेत. नव्या व्यवस्थेमुळे उदयोन्मुखे खेळाडूंकडे लक्ष दिले जाईल. पण, इतर खेळाडू आणि व्यवस्थापन सदस्य बेरोजगार आहेत. मला माहित नाही अशा खेळाडूंची जबाबदारी कोण घेणार?', असे हफीजने ट्विटमध्ये म्हटले आहे.
फजल शुभनने स्थानिक क्रिकेटमध्ये ४० खेळले असून त्याने २३०१ धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये फजलच्या नावावर २९ सामन्यांमध्ये ६५९ धावा जमा आहेत.
'पाकिस्तानसाठी खेळण्यासाठी मी खुप मेहनत घेतली. डिपार्टमेंटल क्रिकेटमधून १ लाखाचे वेतन मिळत होते. मात्र, जेव्हा डिपार्टमेंट बंद झाले तेव्हापासून मला ३०-३५ हजारांचे वेतन मिळते. माझ्याकडे नोकरी असल्याने मी भाग्यशाली आहे. मात्र, पुढचे मला माहित नाही. आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे. त्यामुळे मी भाडे मिळवण्यासाठी पिक अप गाडी चालवतो. हे हंगामी काम आहे. कधीकधी खुप काम असते तर, कधीकधी कमी काम करावे लागते', असे फजलने त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.