कराची -पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने आपली कोरोना चाचणी केली. यात त्याने निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यापूर्वी, पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातील पॉझिटिव्ह खेळाडूंमध्ये हाफिजचा समावेश असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले होते.
यानंतर, हाफिजने स्वत: आणि त्याच्या कुटूंबासाठी वैयक्तिकरित्या चाचणी केली. त्यात तो निगेटिव्ह आढळला. यासंदर्भात त्याने एक ट्विट केले. "काल पीसीबीने घेतलेल्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट आला ज्यामध्ये मी पॉझिटिव्ह होतो. पण मी माझ्या आणि कुटुंबाच्या समाधानासाठी चाचणी केली. यात रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अल्लाह आम्हाला सुरक्षित ठेवू दे ", असे हाफिजने ट्विटमध्ये म्हटले.