कोलंबो - श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मोईन अलीला १० दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.
इंग्लंडचा संघ श्रीलंकेचा दौऱ्यावर आला आहे. यात उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ३ जानेवारीला इंग्लंडचा संघ श्रीलंकेमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडूंसह त्यांच्या साहित्याला देखील विमानतळावर सॅनिटाइज करण्यात आले. यावेळी खेळाडूंची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती.
इंग्लंड खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला. यात मोईन अलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत यांची माहिती दिली. प्रोटोकॉलनुसार मोईन अलीला १० दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.