गाले (श्रीलंका) - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच मोईन अलीला कोरोना झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते.
इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर निघाला असता, सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर इंग्लंडचा संघ जेव्हा हंबनटोटा येथे दाखल झाला. तेव्हा पुन्हा खेळाडूंची चाचणी करण्यात आली. यात मोईन अलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्याला संघातील खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्यावर उपचार सुरू होते.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, मोईन अलीचा क्वारंटाइन अवधी १० दिवसांचा होता. परंतु त्याला कोरोना झाल्याचे समोर आल्याने श्रीलंका सरकारने हा कालावधी १३ दिवसांचा केला.