मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर, विविध क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूही मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. एकदिवसीय संघाची कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू मिताली राज, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
मितालीने कोरोनाविरुद्ध लढ्यात १० लाख रुपयांचा निधी सरकारी यंत्रणांना देण्याचे ठरवले आहे. मितालीने ५ लाखांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीला तर ५ लाखांची रक्कम तेलंगणा सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरवले आहे. मितालीने याची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली.
पूनम यादवने पंतप्रधान सहायता निधीला २ लाखांची मदत देऊ केली आहे. याशिवाय दीप्ती शर्माने ५० हजाराची मदत जाहीर केली आहे.
या खेळाडूंनी केली मदत
- गौतम गंभीर - १.५ कोटी
- सुरेश रैना - ५२ लाख
- सौरव गांगुली - ५० लाख
- सचिन तेंडुलकर - ५० लाख
- अजिंक्य रहाणे - १० लाख ( महाराष्ट्र राज्य सरकार)
- मुंबई क्रिकेट असोसिएशन - १ कोटी
- बीसीसीआय - ५१ कोटी
- युसूफ व इरफान पठाण - ४००० मास्क
- याशिवाय बजरंग पुनिया, मेरी कोम, इशा सिंह, क्रिकेटपटू दीप्ती शर्मा यांनीही मदत दिली आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून देशात रुग्णांची संख्या जवळपास १२०० हून अधिक झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे होणार पुर्नप्रक्षेपण
हेही वाचा -अमेरिकेत असूनही देशाच्या मदतीसाठी धावला साकिब, घेतली २००० कुटुंबांची जबाबदारी